शंताबाई सावरकर उद्योजिका अर्थसहाय्य योजनेची घोषणा...
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- May 27, 2024
- 2 min read
स्वा.सावरकर विचार मंच, पुणे व पिंपरी चिंचवड
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था #घरोघरी_सावरकर #swatantryaveer_samajik_sanstha
देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या पावलावर पाऊल टाकून डॉ. नारायणराव सावरकर यांनी त्यांचे कार्य पुढे नेले. हिंदुचे संघटन केले. संपूर्ण सावरकर कुटुंबियांनीच आपल्या समीधा राष्ट्राच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत, असे विचार डॉ. नारायणराव सावकर यांचे नातू आणि सावरकर यांच्या विचारांचे प्रसारक सात्यकी अशोक सावरकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. नारायणराव सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आणि शांताबाई सावरकर स्मृती सप्ताहानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे सावरकर अध्यासन केंद्रात ‘स्मरण यज्ञकुंडाचे’ या विषयावर सात्यकी सावरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर वीरपत्नी, वीरमाता, ‘सिर्फ’ संस्थेच्या संस्थापिका सुमेधा चिथडे यांची विशेष उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी,कमल कोठारी हे व्यासपीठावर होते.
सात्यकी सावरकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर आणि डॉ. नारायणराव सावरकर यांच्या कार्याचा आढावा सादर केला. तात्याराव आणि बाबाराव शिक्षा भोगत असताना त्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायणराव सावरकर यांनी केलेले प्रयत्न, हिंदूचे संघटन, संघटनात्मक वाढ याविषयी सविस्तर विवेचन केले. देशासंदर्भातील कुठलीही समस्या असली तरी या तिघांमधील विचार करण्याची पद्धत एकच होती याविषयीची काही उदाहरणे त्यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सावरकर कुटुंबिय यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. शांताबाई सावरकर उद्योजिका अर्थसहाय्य योजनेचा शुभारंभ या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी शांताबाई सावरकर उद्योजिका अर्थसहाय्य सेवा योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत निराधार, गरजू महिलांना व्यवसाय वाढीसाठी सहाय्य केले जाणार असल्याचे सांगितले.
राष्ट्राला देण्यासाठीच मी जगणार आहे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जगण्यातून आणि साहित्यातून विचार मिळाला, असे सांगून सुमेधा चिथडे म्हणाल्या, सत्य, निस्वार्थ आणि त्याग या गोष्टी आल्या की आपण मागे सरकतो कारण अनेक प्रश्न आणि एक उत्तर म्हणजे विनायक दामोदर सावरकर. राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रासाठी समर्पण म्हणजे विनायक दामोदर सावरकर. ‘सिर्फ’ या संस्थेच्या माध्यमातून सैनिकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारातूनच मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. माया तुळपुळे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्त्रीयांविषयीचे विचार बघता स्त्रीयांनी धर्मभोळेपणा, देवभोळेपणा आणि अंधश्रद्धा यातून बाहेर पडावे अशी त्यांची दृष्टी होती. वनितांनो विदुला व्हा अबला नको असे ते कायम म्हणत असत. सावरकर यांच्या साहित्यातील स्त्री पात्रे हेच सांगतात की, विचार, प्रिती आणि त्याग यात स्त्रीया पुरुषांपेक्षा मागे नाहीत तर काकणभर सरसच आहेत. स्वदेशी वस्तूंचा वापर करणे हीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक अक्षय जोग यांनी त्यांच्या ‘दुर्लक्षित हिंदुत्ववादी’ या नव्या पुस्तकाविषयी माहिती सांगितली.
संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा या प्रसंगी करण्यात आली. यात अश्विनी कुलकर्णी (पुणे शहर महिला आघाडी प्रमुख), निशिगंधा आठल्ये (पुणे शहर महिला कार्याध्यक्ष), सतिशचंद्र काळे (येरवडा-कोरगाव विभाग प्रमुख), अनुराधा मुनशी (नागपूर शहराध्यक्षा) यांचा समावेश आहे. शहराध्यक्ष विक्रम दिवाण यांनी सूत्रसंचालन केले तर अजित कुलकर्णी यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ दुराफे,कृष्णा वैद्य,योगेश पाटील श्री.बर्वे यांनी परिश्रम घेतले.

コメント